अनघा प्रकाशनची सुरुवात १९७९ साली विजय तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ नागनाथ कोत्तापल्ले व ना. ज. जाईल या प्रसिद्ध लेखकांच्या कादंबऱ्यांच्या प्रकाशनाने झाली. त्यानंतर दरवर्षी सहा पुस्तकांचे प्रकाशन होत होते.
अनघा प्रकाशनाचा रौप्यमहोत्सव २९ जानेवारी २००४ रोजी मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ३३ पुस्तकांच्या प्रकाशनाने साजरा झाला. यावेळी माधव गडकरी, पं. यशवंत देव, अशोक जैन, इसाक मुजावर, वसंत भालेकर, जोसेफ तुस्कानो यासारखी सर्व लेखक मंडळी कार्यक्रमाला हजर होती.
त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे ४२ पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या हस्ते झाले.
अनघा प्रकाशनाने आजवर प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये शरद काळे, मधु मंगेश कर्णिक, प्रा. पु. द. कोडोलीकर, प्रा. म द हातकणंगलेकर, डॉ विजय पांढरीपांडे, मोहिनी वर्दे, अरुण साधू, डॉ. भारतकुमार राऊत, अरुण शेवते, माधवी घारपुरे, चंद्रसेन टिळेकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटोयांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. .
मराठीतील सर्व वाङमय प्रकारातील पुस्तके अनघा प्रकाशनने प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत.
अनघा प्रकाशनचा ४० वा महोत्सव १४ एप्रिल २०१९ रोजी सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक पद्मश्री वामन केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत थाटात साजरा झाला. त्यावेळी मधु मंगेश कर्णिक यांच्या समग्र वाङमयातील निवडक भाग असलेली प्रातिनिधिक तीन पुस्तके व आकाशवाणीतील अधिकारपदावरून निवृत्त झालेल्या महेश केळुसकर यांची, आवाजावर आधारित शास्त्रशुद्ध रीतीने मांडणी केलेले `माझा आवाज’ मालवणी मुलुखातील `दशावतार’, `लळित’ व `चित्रकथी’ या प्रकारांवर अभ्यासपूर्ण तयार केलेली पुस्तकेदेखील प्रकाशित करण्यात आली.
अनेक छोट्या-मोठ्या पुस्तकांबरोबर जोसेफ तुस्कानो यांच्या `विज्ञानवाटा’ या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. अनघा प्रकाशनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्कृष्ट प्रकाशनाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे